सायंकाळी ५ वाजता शपथविधी
मुंबई, दि. ३१: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल घडून आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज (३१ जानेवारी) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजता राजभवनात हा शपथविधी होणार असून, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार, मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची निवड
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर कोणताही विरोध न होता सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. या निर्णयानंतर राज्य मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची संपूर्ण जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार आहे.
सायंकाळी ५ वाजता शपथविधी
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आज सायंकाळी ५ ते ५.१२ या कालावधीत पार पडणार आहे. या शपथविधीत त्यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शपथ देणार आहेत.
आजच्या कार्यक्रमात फक्त सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून, मंत्रिमंडळात कोणतीही अतिरिक्त भर होणार नाही.
उपमुख्यमंत्रिपदासोबत खात्यांचे चित्र
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थ खाते आणि इतर महत्त्वाची खाती होती. सध्याच्या घडीला, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, मात्र अर्थ खाते तात्पुरते वगळता इतर काही खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे.
सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभाग ही खाती आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खाते पुन्हा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले जाऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आगामी काळात पक्ष आणि सरकारची दिशा त्यांच्या नेतृत्वाखाली कशी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
