वित्त आणि नियोजन खाते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार?
मुंबई, दि. ३१: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत (अतिरिक्त कार्यभार, महाराष्ट्र) यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोबतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत भावूक सोहळा
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा असल्याने हा सोहळा अत्यंत साधेपणाने लोकभवनातील ‘दरबार हॉल’मध्ये पार पडला. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेण्यास सुरुवात करताच उपस्थित कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सभागृहात “अजित दादा अमर रहे, अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
विमान दुर्घटना आणि राजकीय वारसा
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाले होते. या धक्क्यातून सावरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाने सुनेत्रा पवार यांची एकमताने नेतेपदी निवड केली. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक निर्णयाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेनेही पाठिंबा दर्शवला आहे.
नवी जबाबदारी आणि खात्यांचे वाटप
सुनेत्रा पवार यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क (Excise), क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी असेल. दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त आणि नियोजन खाते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असण्याची शक्यता आहे.
या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
