अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई, दि. ६ : राज्यामध्ये सन २०२५-२६ पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत आज अंतिम मुदतीपर्यंत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती प्र.संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
या प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये ९,४३५ नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता २१,२३,०४० इतकी असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १८,९७,५२६ तर कोटा प्रवेश क्षमता २,२५,५१४ इतकी आहे. यासाठी दिनांक २६ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करण्यात आली.
यामध्ये १२,१५,१९० विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क ऑनलाईन जमा केलेले आहे. १२,०५,१६२ विद्यार्थ्यानी अर्ज भाग-१ भरलेले आहेत. तर, अर्ज भाग-२ भरुन अंतिम करुन ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत. नियमित फेरी (कॅप राऊंड) साठी ११,२९,९३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. इनहाऊस कोटा साठी ६४,२३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोटासाठी ३२,७२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोटासाठी ४७,५७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.
वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी ८ जून २०२५ रोजी जाहीर होणार असून दिनांक ९ जून ते ११ जून २०२५ या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत. तसेच कॅप फेरीची गुणवत्ता यादी १० जून २०२५ रोजी जाहीर होणार असून दिनांक ११ जून ते १८ जून २०२५ या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ- https://mahafyjcadmissions.in पाहावे. तसेच ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
