“याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!” – संजय राऊत
मुंबई, दि. २५ : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. यंदाच्या पद्म पुरस्कार यादीत पाच राजकीय नेत्यांचा समावेश असून, त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
या घोषणेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!” असे ट्वीट करत संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना (भगतसिंह कोश्यारी) मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले.”
तसेच त्यांनी पुढे म्हटले, “याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!”
भगतसिंह कोश्यारी यांचा राजकीय प्रवास
भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी २०१९ ते २०२३ या कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली. या काळात ते अनेक राजकीय घडामोडींमुळे चर्चेत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल म्हणून त्यांची भूमिका वारंवार चर्चेचा विषय ठरली होती.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून शपथ दिली होती. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेच्या वेळीही ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपालपदावर असतानाच त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. यापूर्वी ते उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री राहिले आहेत.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झाला होता असंतोष
महाराष्ट्राचे राज्यपाल असताना भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. विशेषतः महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहासंदर्भात केलेल्या टिप्पणीवर तीव्र टीका झाली होती. या वक्तव्यांनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विविध स्तरांतून करण्यात आली होती.
