शिवसेना घेऊन येत आहे ‘प्रथम ती महिला संमेलन’
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढवण्याचे निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जन आशीर्वाद यात्रा, आदित्य संवाद, माऊली संवाद नंतर आता शिवसेना ‘प्रथम ती महिला संमेलन’ हा एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. महाराष्ट्रातील एक वेगळा पुढाकार, महिलांना प्रथम स्थाब देणारे, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने “प्रथम ती-महिला संमेलन” आयोजित केले असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे संमेलन शिवसेनेच्या २० महिला नेत्या घेणार आहेत. आज ९ सप्टेंबर पासून या कार्यक्रमाची परभणी येथून सुरुवात होणार आहे. या २० शिवसेना नेत्या सप्टेंबर महिना अखेर संपूर्ण महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील ५ लाख महिलांना प्रत्यक्ष भेटतील.
पहिल्या टप्प्यात परभणी, नांदेड, सोलापूर, संभाजीनगर आणि धाराशिव येथे सप्टेंबर ९ ते ११ दरम्यान सभा होणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.
