शिवसेनेसोबतच्या नवीन सत्ताकारणात काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा खोडा, पुन्हा एकदा टोकलं नेत्यांना
मुंबई: शिवसेना-भाजप युतीचं सत्तास्थापनेचं घोंगडं सध्या भिजत पडलंय. मुख्यमंत्री पद कोणाकडे पासून ते ५०-५० टक्के च्या फॉर्म्युल्यापर्यंत अशा काही मुद्द्यांवर चर्चा अडकली आहे. यात शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्याचे सध्यातरी दिसते आहे. या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांकडून सेनेला सत्तास्थापनेसाठी उघडपणे पाठिंबा देण्याबाबत विधानं करण्यात येत आहेत. पण यात संजय निरुपम यांच्या एका विधानाने खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
दिनांक २७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक ट्विट केले होते ज्यात त्यांनी काँग्रेस च्या राज्यातील नेत्यांना उद्देशून म्हटले होते की, “शिवसेना कधीच भाजपच्या छायेखालून बाहेर येऊ शकत नाही. तर शिवसेनेला डोळा मारण्यात काहीच अर्थ नाही. अपेक्षा आहे हे राज्यातील काँग्रेस नेत्यांना कळेल.”
या त्यांच्या ट्विट वर उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागल्या. पण आज याच आपल्या ट्विट चं त्यांनी समर्थन करत त्यांनी नवीन ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “माझ्या आधीच्या वक्तव्याचा मी पुनरुच्चार करतोय की काँग्रेस ने शिवसेना-भाजपच्या या नाट्यात पडू नये. हे खोटं आहे. जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठीची त्यांची ही तात्पुरती लढाई आहे. ते पुन्हा एकत्र येतील आणि आपल्याला शिव्याच देणार आहेत.” पुढे पुनः एकदा काँग्रेस नेत्यांवर टीका करत ते म्हणाले की, “काही काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचारच कसा करू शकतात. त्यांचं भान हरपले आहे की काय?”
पण सध्या संजय निरुपम हे या मुद्द्यावरून काँग्रेस मध्ये एकटे पडले आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मधील मिलिंद देवरा असोत की राज्यातील बडे नेते असोत या कोणाशीच संजय निरुपम यांचे सध्या पटत नाहीये. मुळात संजय निरुपम यांचा शिवसेनेला असलेल्या विरोधामध्ये भूतकाळातील घटनांची पार्श्वभूमी आहे. पण सध्या एकाकी निरुपम यांना काँग्रेस नेतृत्व किती महत्व देईल हे पाहणं लक्षणीय ठरेल.
