भाजपचे राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन
मुंबई, दि. १७: राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६५ वर्षाचे होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास करीत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते.
ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमदार कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचे व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे.
