मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपाचा पेच कायम; शिंदेसेनेची गट नोंदणी अचानक पुढे ढकलली
मुंबई, दि. २७: मुंबई महानगरपालिकेतील सत्ता वाटपावरून सुरू असलेला पेच अद्याप कायम असून, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या अचानक साताऱ्याच्या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेगळेच वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर भाजप आणि शिंदेसेना यांच्यात मुंबई महापालिकेतील सत्तावाटपाबाबत चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, फडणवीस मुंबईत परतल्यानंतरही अद्याप अशी कोणतीही बैठक झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने महापालिकेतील नगरसेवकांची गट नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेसेना मिळून एकूण ११८ नगरसेवक आहेत. या संख्येच्या जोरावर महायुतीकडे काठावरचे बहुमत आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी संयुक्त गट नोंदणी करावी, यासाठी भाजपकडून आग्रह धरला जात होता. मात्र, शिंदेसेनेने स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकण भवनातील गट नोंदणी रद्द
शिंदेसेनेचे २९ नगरसेवक आज नवी मुंबईतील कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी जाणार होते. त्यासाठी पक्षाकडून नगरसेवकांना पूर्वसूचना देण्यात आली होती. नगरसेवकांना नवी मुंबईला नेण्यासाठी लक्झरी बसदेखील सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी हा संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आला असून बस परत पाठवण्यात आल्या.
आजचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत उपस्थित नसल्यामुळे गट नोंदणी पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
गट नोंदणी लवकरच होण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेसेनेची गट नोंदणी उद्या किंवा परवा होऊ शकते. त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील सत्ता वाटप आणि महापौरसह इतर पदांच्या वाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी महायुतीतील हालचाली वेग घेत असतानाच, गट नोंदणीचा मुद्दा आणि सत्ता वाटपाचा तिढा कधी सुटतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
