व्यापक जनसहभागातून नवी मुंबईत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा
नवी मुंबई, दि. २८: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ राज्यभरात लागू होऊन २८ एप्रिल रोजी १० वर्षे पूर्ण होत असल्याने या दशकपूर्तीचे औचित्य साधून २८ एप्रिल रोजी ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यात आले.
सेवा हक्क दिनानिमित्त नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांनी घेतली सेवाभावाची शपथ
नवी मुंबई महागरपालिका मुख्यालयात शासन निर्देशानुसार सकाळी ११ वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत सेवा हक्क दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये एकत्र येत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्यासह सामुहिक शपथ ग्रहण केली. यामध्ये – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पध्दतीने विहीत कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी मला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीतनेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी मी कटिबध्द राहीन. मी, सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन. मी, उक्त कायद्याने नागरिकांना प्रदान केलेल्या सेवेच्या हक्काचा आदर ठेवून व नागरिकांविषयी सेवा भाव ठेवुन त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करेन – अशी शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, सहा. आयुक्त प्रबोधन मवाडे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, प्रशासकीय अधिकारी संजीव पवार, मुख्य स्वच्छता अधिकारी संजीव शेकडे, विधी अधिकारी अभय जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसेवांविषयी जनजागृतीसाठी मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्यांचे आयोजन
लोकसेवांविषयी व त्या लोकसेवा नागरिकांना पुरविण्यासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या ऑनलाईन प्रणालीसह इतर सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहचण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विशेष पथनाट्याचे सादरीकरण महापालिका क्षेत्रात आज विविध ठिकाणी होत असून त्याचा आरंभ महापालिका मुख्यालयातील कार्यक्रमापासून करण्यात आला. यावेळी उपस्थित महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच या कार्यक्रमात सहभागी नागरिकांनीही पथनाट्यातून दिल्या जाणा-या मनोरंजनातून प्रबोधनात्मक संदेशाची प्रशंसा केली. विविध विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी या पथनाट्यांचे सादरीकरण करून लोकसेवांविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे.
क्यू आर कोडसह माहितीपूर्ण फलकांचे ठिकठिकाणी प्रदर्शन
लोकसेवा हक्क दिवसाची तसेच त्या माध्यमातून लोकसेवांची माहिती जनतेपर्यंत पोहचण्यासाठी महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालये व इतर कार्यालयांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ विषयी माहिती देणारे बॅनर प्रदर्शित करण्यात आले असून त्यावर अधिसूचित सेवा व शुल्काची माहिती सहजपणे उपलब्ध होण्यासाठी क्यू आर कोड प्रसिध्द करण्यात आले आहेत.
नागरिक आपल्या मोबाईलवर हा क्यू आर कोड स्कॅन करून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ विषयीचा शासन निर्णय व त्याची माहिती उपलब्ध करून घेऊ शकतात तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणा-या ६८ लोकसेवांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात. यामध्ये सेवा, त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे, सेवा पुरविण्याचा विहित कालावधी, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, सेवा पुरविणारा पदनिर्देशित अधिकारी, सेवेबाबत तक्रार करावयाची झाल्यास प्रथम अपिलिय अधिकारी, व्दितीय अपिलिय अधिकारी अशी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सदर सेवा उपलब्धतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची असल्यास त्यासाठीचा क्यू आर कोडही या बॅनरवर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर बॅनर डिजीटल स्क्रिनवरही प्रदर्शित करण्यात आले असून याव्दारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लोकसेवांची माहिती पोहचविली जात आहे.
लोकसेवांविषयी जागरूकता मेळाव्यांचे आयोजन
याशिवाय समाजविकास विभागाच्या वतीने 8 विभाग कार्यालय क्षेत्रात बहुउद्देशीय इमारत बेलापूरगाव, नमुंमपा शाळा क्र. १२ सेक्टर – ६ सारसोळे नेरूळ, नमुंमपा शाळा क्र. २८ वाशी, नमुंमपा शाळा क्र. २२ तुर्भे स्टोअर, नमुंमपा शाळा क्र. ३५ सेक्टर – ७ कोपरखैरणे, नमुंमपा शाळा क्र. ७६ घणसोली, सेक्टर – ४ समाजमंदिर ऐरोली व नमुंमपा शाळा क्र. ५२ दिघा अशा ८ ठिकाणी लोकसेवा हक्क कायद्याविषयी जागरूकता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे मेळावे यशस्वी केले.
सेवा हक्क दिवसानिमित्त असे विविध उपक्रम राबवून त्यामध्ये जनसहभागावर विशेष भर देण्यात आला असून नागरिकांपर्यंत लोकसेवांची माहिती पोहचविण्यात आली तसेच याबाबत काही तक्रार असल्यास त्या नोंदविण्यासाठीही उपलब्ध सेवांची माहिती करून देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ६८ लोकसेवा एका क्लिकवर ऑनलाईन उपलब्ध
नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित लोकसेवा तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून या सेवा विनासायास एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात याकरिता माझी नवी मुंबई – My NMMC ॲप उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवरूनही नागरिक या सेवा उपलब्ध करून घेऊ शकतात. तरी नागरिकांनी महानगरपालिकेने पुरविलेल्या या सेवासुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
