प्रभाग क्रमांक ९ मधील हायव्होल्टेज लढतीत शिंदे गटाचे शारंगधर देशमुख विजयी
कोल्हापूर, दि. १६: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज लढत मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व सतेज पाटील यांचे साथ सोडून गेलेले शारंगधर देशमुख यांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शारंगधर देशमुख यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 9 मधील ही लढत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची ठरली होती.
या तुल्यबळ लढतीत काँग्रेस उमेदवार राहुल माने यांचा शारंगधर देशमुख यांनी पराभव केला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चुरशीची स्थिती पाहायला मिळाली. अखेर निर्णायक आघाडी घेत शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला. हा विजय त्यांच्यासाठी तसेच शिवसेना शिंदे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती आणि काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत सुरू असल्याचे चित्र आहे. विविध प्रभागांमधील निकालांमुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून, महापालिकेवर अखेर कोणाचा झेंडा फडकणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील अंतिम सत्ता कोणाच्या हाती जाणार, याचे स्पष्ट चित्र उर्वरित निकालांनंतर समोर येणार आहे.
