केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारत टॅक्सीच्या ‘सारथीं’शी साधला संवाद
नवी दिल्ली, दि. २३: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे भारत टॅक्सीच्या ‘सारथीं’शी संवाद साधला. संवादादरम्यान केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, जे काम करतात त्यांनाच नफा मिळाला पाहिजे. त्यांनी सांगितले की, टॅक्सी मालकाला समृद्ध करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे आणि ‘सारथी’ हा खरा मालक आहे. शाह म्हणाले की, ‘सारथी’ हे भारत टॅक्सीचे मालक आहेत आणि नफ्यात त्यांचाही वाटा असेल. सहकार मंत्री म्हणाले की, येत्या तीन वर्षांत देशभरातील प्रत्येक महानगरपालिकेत ‘भारत टॅक्सी’असेल.
अमित शाह म्हणाले की, देशातील पाच प्रमुख सहकारी संस्थांना एकत्र करून भारत टॅक्सीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, ‘सारथीं’ची संख्या जसजशी वाढेल , भागीदार बनू इच्छिणाऱ्या कोणत्याही ‘सारथी’ला ₹ ५०० किमतीचे शेअर्स खरेदी करून मालकी हक्क मिळवता येतील. शाह पुढे म्हणाले की, जेव्हा भारत टॅक्सीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका होतील तेव्हा काही जागा सारथींसाठी राखीव ठेवल्या जातील. एकदा का, सारथी हे संचालक मंडळाचा भाग झाले की, ते स्वतः इतर चालकांचे हित आणि चिंता यांचे रक्षण करतील आणि त्यांचे प्रतिनिधित्व करतील.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, भारत टॅक्सीमध्ये ‘सारथी दीदी’ (महिला चालक) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. भारत टॅक्सीची ‘सारथी दीदी’ सुविधा महिला सारथींना स्वावलंबी बनवेल आणि महिला प्रवाशांची आणि सारथींची सुरक्षितता सुनिश्चित करेल. ते म्हणाले की, येत्या काळात भारत टॅक्सी ॲपमध्ये ‘सारथी दीदी’ या नावाने एक तरतूद केली जाईल जेणेकरून जेव्हा जेव्हा एकटी महिला प्रवासी असेल तेव्हा तिच्यासाठी स्वाभाविकपणे ‘सारथी दीदी’ ला प्राधान्य दिले जाईल.
