शिंदेंच्या गद्दारीमुळेच मुंबईत भाजपचा महापौर; मराठी माणसाशी बेईमानीचा आरोप
मुंबई, दि. १७: “एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, तर भाजपच्या १०० पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता,” असा घणाघाती आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप आणि शिंदे गटावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला.
“ज्यांनी मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवला, त्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या अवलादी असल्याचा हा प्रकार आहे,” असा थेट उल्लेख करत राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर गद्दारीचा ठपका ठेवला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मराठी माणसाशी बेईमानी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्ता गेली म्हणून लढाई संपलेली नाही
लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा सर्व निवडणुकांनंतरही “सत्ता नसली म्हणजे लढाई संपली असं होत नाही. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो,” असं ठामपणे सांगत राऊत म्हणाले की, आम्ही छातीचा कोट करून मुंबईचं रक्षण करू.
ठाकरे बंधूंच्या युतीला ७१ जागांचं बळ
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांबाबत बोलताना राऊत म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे दोघांना मिळून आम्ही ७१ जागा जिंकल्या. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला, त्यामुळे ७१ जागा जिंकणं ही मोठी अचिव्हमेंट आहे.”
भाजप आणि शिंदे गटाकडे केवळ अल्प बहुमत असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, सभागृहात साधारण ११० सदस्य विरोधात बसणार आहेत. त्यात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसचे नगरसेवक मिळून शंभरावर सदस्य विरोधी बाकावर असतील.
“भाजपच्या तोंडाला फेस आणू”
“हा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का?” असा सवाल उपस्थित करत राऊत म्हणाले की, शिवसेना आणि इतर पक्ष मिळून भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणतील. “मुंबई कोणत्याही परिस्थितीत अदानीच्या घशात घालू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले की, शिंदे गटाकडे गेलेल्या आमच्या ६० नगरसेवकांपैकी ९० टक्के पराभूत झाले. “आमच्या १२ ते १३ जागा या अवघ्या ५० ते २०० मतांच्या फरकाने दुर्दैवाने पडल्या,” असं सांगत त्यांनी सत्तेची ताकद, झुंडशाही आणि पैशाच्या जोराविरुद्ध मोठा संघर्ष केल्याचा दावा केला.
भविष्यात ठाकरे बंधूंची युती कायम राहील का, या प्रश्नावर राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “ही युती तात्पुरती नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहू,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मनसेच्या उमेदवारांना अपेक्षित यश न मिळाल्याबाबत दोन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील, असंही त्यांनी नमूद केलं.
