पुराव्यांसह सरकारला थेट इशारा
मुंबई, दि. २३: २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मात्र, हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता आता दाट होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. “जर या प्रकरणाचा थातूरमातूर तपास झाला, तर मराठी माणूस काय असतो ते दाखवून देऊ,” असे म्हणत त्यांनी या तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तपासाच्या नावाखाली ‘फ्रिज’मध्ये टाकण्याचा प्रयत्न?
रोहित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीबीआय (CBI) तपासाच्या गतीवर नाराजी व्यक्त केली. सीबीआयकडे आधीच हजारो केसेस प्रलंबित असताना, अजितदादांची केस केवळ वेळकाढूपणासाठी त्यांच्याकडे दिली आहे का? असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच, विमान कंपनी (VSR) आणि सत्तेतील नेत्यांचे लागेबांधे असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आणि त्यांच्या भाषणात जे मुद्दे मांडले, ते खालीलप्रमाणे आहेत:
- “अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे असतील, लहान-सहान कार्यकर्ते असतील, सगळे सातत्याने बोलत आहेत. पायलट संदर्भात बोलत असताना आम्ही पण डिटेल बोललो आहोत. माझी पण इच्छा आहे की, पारदर्शक तपास व्हावा. सीबीआय तपास दिला गेलाय. गेल्या महिन्याभरात त्यांनी काय तपास केलाय, सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले का? क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे ते केले का? सखोल चौकशी करणं महत्त्वाचे आहे.”
- “दोन थातूरमातूर रिपोर्ट दिले गेले. सत्तेतील लोकांचे आणि व्हीएसआरचे कसे संबंध होते? मंत्र्यांचे संबंध व्हीएसआरसोबत कसे होते याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सीबीआय तपास होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आतापर्यंत ७ हजार ७५ केसेसचे निकाल दिले गेले नाहीत. बर्फात आणि फ्रिजमध्ये केसेस टाकायच्या असा हा प्रकार आहे. सीबीआयला केस देताना कालमर्यादा देण्याची गरज आहे.”
- “मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पत्र तयार केलं आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेत आम्ही पत्र आणि पुरावे देऊ. सीएमच्या अंतर्गत सगळेच प्रश्न सुटेल असे नाही. अमित शाह यांना आम्ही रिपोर्ट पाठवले आहेत. डीजीसीएला पण रिपोर्ट पाठवले आहेत. ७० टक्के माहिती आम्ही मागे ठेवली आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही, योग्य पद्धतीनं तपास व्हावा.”
- “ब्लॅक बॉक्स किती जळला याचा देखील पुरावा आमच्याकडे आहे. श्वेता सिंह कशा भ्रष्टाचार करत आल्या आहेत, त्यासंदर्भात देखील तपास व्हायला पाहिजे. थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देऊ. गेल्या महिन्याभरात काय तपास केला ते सांगा. सीबीआयकडे आधीच तपासासाठी खूप प्रकरणे आहेत.”
- “अजित काकांसाठी आम्ही लढत राहू. नेमकं काय घडलं? हे महाराष्ट्राला माहिती झालं पाहिजे. अजितदादा मला मिश्किलपणे टोमणे देखील मारायचे. रुबाबात येत असायचे, अधिवेशनात येणारे पहिले नेते अजित पवार असायचे आणि सर्वात उशिरा जाणारे नेते देखील अजित पवारच असायचे. एक मराठी नेता, शिस्तप्रिय अनुभवी नेता आता आपल्यात नाही. काहीही झालं तरी लढत राहू आणि लोकांचे मुद्दे मांडत लढत राहू.”
अजितदादांची ‘ती’ शिस्त आणि रिकांमी जागा
रोहित पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले. पहाटे हजर होणारे आणि कामात कसलीही कसर न सोडणारे दादा आता आपल्यात नाहीत, याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. मात्र, या निधनामागचे गूढ उकलण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
राज्यसभा आणि शरद पवारांची भूमिका
राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार साहेबांचा अनुभव राज्याला आणि देशाला आवश्यक आहे. साहेब मुंबईत आल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. अजित पवार यांचीही तीच इच्छा होती, असे त्यांनी नमूद केले. मात्र, सध्याच्या घडीला अजित पवार यांच्या गटाशी यावर चर्चा होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
