संस्थेची ३५वी मोहीम यशस्वीरित्या संपन्न
रोहा: ‘शिवशंभू प्रतिष्ठान’ दुर्गप्रेमी संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध गड किल्ल्याच्या संवर्धनाचे कार्य गेले अनेक वर्षे अविरतपणे चालू आहे. या संस्थेच्या मार्फत गड किल्ल्याची स्वच्छता, पाय वाटेवरील कचऱ्याचे संकलन, किल्ल्यावरील पुरातन वस्तूंचे जतन असे विविधांगी उपक्रम राबविले जातात.

२९ मार्च रोजी रोहा तालुक्यातील अवचितगड येथे शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे ३५वी मोहीम आयोजित करण्यात आली होती. मुळात साधारण आठवड्याभरापूर्वी याच किल्यावर सदर संस्थेने ३४ वी मोहीम आयोजिली होती. त्यावेळी मोहिमेवरून परतताना काही सदस्य वाट चुकले व त्यांच्या नजरेस एक पुरातन तोफ पडली. परंतु सूर्य मावळतीची वेळ असल्याने या सदस्यांना त्यावेळी ती तोफ गडावर नेता आली नाही पण याच वेळी या संस्थेचे विशाल तेलंगे व राज म्हसकर यांनी त्यांच्या टीम शी चर्चा केली व ही तोफ गडावर पोहोचती करण्यासाठी बरोबर आठवड्याभराने पुन्हा एक विशेष मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

अखेर तो दिवस आला. २९ मार्च म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी शिवशंभू प्रतिष्ठानच्या ६० मावळ्यांनी या पुरातन तोफेला अवचितगडावर नेण्याच्या मोहिमेला भल्या पहाटे सुरवात केली.
साधारण दिड ते दोन तास घाम गाळल्यावर ही तोफ अवचितगडावर सुखरूपपणे पोहोचविण्यात आली.
या पूर्वीही अशाच प्रकारे या संस्थेने एक एक करत या गडावर तोफांची प्राणप्रतिष्ठा केली असून सध्या गडावर एकूण पाच तोफा आहेत. शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर असेच उपक्रम राबविले जातात.
अवचितगड मुंबई पासून साधारण साडेतीन तासाच्या अंतरावर आहे. कोकण रेल्वेच्या निडी स्थानकापासून साधारण २ ते ३ किमी अंतरावर हा गड आहे. इतिहास काळात रामदास स्वामींनी किल्ल्यावर काही दिवस वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.
खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा
