भारताची एकूण निर्यात २०२३-२४ मधल्या ७७८.१ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ६.०१ % वाढून विक्रमी ८२४.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली
रिझर्व्ह बँक अहवालात आकडेवारी जाहीर
नवी दिल्ली/मुंबई, दि. २: रिझर्व्ह बँकेने मार्च २०२५ साठी सेवा व्यापाराबद्दल जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात ८२४.९ अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या ७७८.१ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या आकडेवारीपेक्षा यावर्षीची निर्यात ६.०१ % ने जास्त आहे. हा देशाच्या निर्यातीमधला एक महत्वाचा टप्पा आहे.

सेवा निर्यातीच्या वाढीचा वेग वाढत राहिल्याने तिने २०२४-२५ मध्ये ३८७.५ अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. हा आकडा मागील वर्षीच्या ३४१.१ अब्ज डॉलर्स निर्याती पेक्षा १३.६ % ने जास्त आहे. सेवा निर्यात मार्च २०२४ मध्ये असलेल्या ३० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये १८.६ % ने वाढून ३५.६अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली होती.

पेट्रोलियम उत्पादने वगळता व्यापारी मालाची निर्यात २०२३-२४ मध्ये ३५२.९ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. त्याच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ती ६ % वाढून विक्रमी ३७४.१ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक बिगर-पेट्रोलियम माल निर्यात आहे.

