भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात फक्त ०.२५ टक्के कपात
मुंबई, दि. ९: भारतीय रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाच्या पहिलं पतधोरण आज जाहीर झालं. बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात ०.२५ टक्के कपात करून तो ६ टक्क्यांवर आणला आहे. पतधोरण समितीनं २०२५-२६ साठीचा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या दराचा अंदाज सहा पूर्णांक ७ दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे. हा दर ६ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असा अंदाज पतधोरण समितीने फेब्रुवारीत व्यक्त केला होता. त्याचवेळी गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांवरुन साडे ६ टक्के होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या आर्थिक वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर ४ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं. यापूर्वी हा दर ४ पूर्णांक ८ टक्के राहण्याचा अंदाज होता. याव्यतिरिक्त, सोने तारण कर्जाच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक नियमावली प्रसिद्ध करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच यूपीआय द्वारे होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार असल्याचं सूतोवाचही त्यांनी केलं.
Source – AIR
