नाशिकमध्ये आयोजित शिल्प समागम मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट
नाशिक, दि. २४: सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने नाशिक येथे भरलेल्या नऊ दिवसीय शिल्प समागम मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल संध्याकाळी भेट दिली.
नाशिक मधील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असलेल्या या शिल्प समागम मेळ्यामध्ये महाराष्ट्र, आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, केरळ, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश इत्यादी राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, सफाई कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, आदींनी उत्पादित केलेल्या विविध कलात्मक हस्तकललेच्या वस्तूंचे, हातमागावरील साड्या, माती कामाच्या वस्तू, खेळणी, पादत्राणे अशा उत्पादनांचे शंभरपेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, ‘नॅशनल शेड्युल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’, ‘नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’, ‘नॅशनल बॅकवर्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती-जमाती, सफाई कर्मचारी यांनाही विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, मंत्रालयातर्फे अशाप्रकारे उपक्रम राबविले जात आहेत. स्थानिक हस्तकला कारागिरांना ताकद देण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. अशाच प्रकारे दिव्यांग कलाकारांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी देखिल मंत्रालयातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

नाशिक मध्ये आयोजित या प्रदर्शनाला नाशिककर चांगला प्रतिसाद देत असून, आतापर्यंत या प्रदर्शनात रुपये ६१ लाखापेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे. पुढील दोन-तीन दिवसात उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत होईल, अशी अपेक्षा आहे.

यावेळी ‘नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्य संयोजक व व्यवस्थापक सुरेश कुमार यांनी प्रास्ताविकामध्ये सामाजिक न्याय मंत्रालयाकडून गेल्या दोन वर्षापासून अशा प्रकारचे उपक्रम, शिल्प समागम मेळावे, देशातील विविध शहरात आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. यानंतरचा मेळा आसाम मध्ये गुवाहाटी येथे भरणार आहे. या कार्यक्रमामध्ये स्थानिक कलाकारांनी मनोरंजनपर सादरीकरण केले, त्यालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवार, दिनांक २६ जानेवारीपर्यंत हा मेळा सर्वांसाठी खुला आहे.
