निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई, दि. १७: देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत (BMC Election Result 2026) तब्बल २५ वर्षांनंतर सत्तांतर झालं आहे. २०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता हस्तगत करत ठाकरे गटाची एकहाती सत्ता संपुष्टात आणली आहे. भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत मुंबईत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.
या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ला ६५ जागा मिळाल्या असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला ६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचाच होणार, हे स्पष्ट झालं आहे.
ठाकरे बंधू २० वर्षांनंतर एकत्र; अपेक्षित यश मिळालं नाही
मुंबई महापालिकेची ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ठाकरे बंधूंनी मिळून एकूण २१८ जागांवर निवडणूक लढवली होती. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १६५ जागा, तर मनसेने ५३ जागा लढवल्या.
या युतीला एकूण ७१ जागांवर यश मिळालं असून, यात शिवसेना ठाकरे गटाच्या ६५ आणि मनसेच्या ६ जागांचा समावेश आहे. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचं चित्र निकालातून समोर आलं आहे.
निकालानंतर राज ठाकरेंची सोशल मीडियावरून पहिली प्रतिक्रिया
मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जाणून घ्या राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे:
“सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.”
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.”
“आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.”
“एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे.”
“निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया.”
