मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विविध राजकीय, आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करत मनसैनिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शिवतीर्थावर पार पडलेल्या या मेळाव्यात त्यांनी पक्षाच्या वीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत, आगामी काळात सत्तेचा दावा करत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे म्हणाले, “९ मार्च २००६ ला पक्ष स्थापन झाला आणि १९ मार्च २००६ ला पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावर झाली. आज २० वर्ष झाली पक्षाला आणि आनंदाची नि भाग्याची गोष्ट अशी की २० वर्षानंतर १९ मार्चला गुढी पाडवा यावा, मी याला शुभ संकेत पकडतो. निवडणुका आल्या गेल्या झालं, शिमगे झालं, सगळं झालं, आपण जे उभे आहोत ते महाराष्ट्रात उभे आहोत. मी जे तुम्हाला बोलतोय ते तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये.”
“मनसेची सत्ता येणार”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “मी जे तुम्हाला बोलतोय ते टाळ्यांसाठी बोलत नाहीये, मी जो तुम्हाला शब्द दिलाय तो या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायचीय ती सत्ता भविष्यात हातात घेणार, हे मी फक्त तुमच्या टाळ्या घेण्यासाठी म्हणून नाही, तो माझा आत्मविश्वास आहे.” त्यांनी पुढील तीन वर्षांत निवडणुका नसल्याचा उल्लेख करत कंत्राटी व्यवस्थेवर टीका केली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही भाष्य
आज देशातही धाकधूक सुरु आहे, भीषण परिस्थिती आहे, गॅस मिळत नाहीये,नेहमी नॉर्मलला असणारी लोकं सध्या गॅसवर आहेत. खरंतर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. या देशामध्ये येणारं सगळं बरेचसं तेल इराणमधून येतं ते आपल्याला रुपयात देत आले, पुढचं मला माहिती नाही. खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठंच निषेधाचं स्टेटमेंट काढलं नाही, हल्ल्यावर कुठलं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर भारताला पाठिंबा देत आला, त्याच्या मागे अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही याचा त्रास भविष्य काळात आपल्याला होणार आहे.
“देश कुठं चाललाय?”
राज ठाकरे यांनी देश आणि राज्याच्या दिशेबाबत संभ्रम व्यक्त करत म्हटले, “आज सगळ्या बाजूने समजत नाही, नेमके कुठे चाललो आहोत काय चाललो आहोत. या देशामधील राज्य कुठं चालली आहेत, लोकं कुठं चालली आहेत, प्रगती कुठं होत आहे.”
बाळासाहेबांच्या आठवणी
राजकारणातील सुरुवातीच्या दिवसांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, “मी ज्यावेळेला राजकारणात आलो… भाषण जेव्हा करशील तेव्हा लक्षात ठेव, काय बोललो याला महत्त्व नाही, काय दिलंस हे महत्त्वाचं आहे, समोरच्याला काय दिलंस हे लक्षात ठेव असं बाळासाहेबांनी सांगितल्याचं.”
सोशल मीडियावरून बाहेर पडण्याचे आवाहन
राज ठाकरे यांनी तरुणांना उद्देशून स्पष्ट शब्दांत सांगितले, “आज तुम्हाला सगळ्यांना, देशाला करमणुकीत गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल चालू आहे, पिक्चर येत आहेत, ते हाऊसफूल जात आहेत. मी तुम्हाला महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या, इन्स्टाग्राम तुम्हाला त्यात गुंतवतं. डान्सबार बंद झालं, इकडे मोबाईलवर ते सुरु झालं. तुम्हाला आतमध्ये गुंतवून ठेवलं आहे. तुम्हाला करमणुकीत गुंतवून ठेवायचं आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. तुम्ही इतके आतमध्ये अडकून गेले पाहिजेत आणि प्रश्न विचारले नाही पाहिजेत, याच्यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरु नाहीये, जगभरात सुरु आहे. आयपीएलमध्ये अडकावं, चित्रपटात अडकावं, टीव्हीत अडकून राहावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं, मग आपल्याला आजूबाजूला काही बघता येत नाही, पाहता येत नाही, विचार करता येत नाही. पूर्वीच्या काळात लोकं जसे रस्त्यावर येत असतं आता लोक मोबाईलवर राग व्यक्त करत आहेत, हे तुम्हाला गुंतवून टाकणं आहे. वृत्तवाहिन्यांवर दबाव टाकण्यात येतो. एका विचित्र परिस्थितीत देश अडकला आहे, राज्य अडकलं आहे. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात त्या कायमस्वरुपी नसतात, खालून काठी नाही बसली तर वरुन बसतेच. करमणुकीच्या गटारगंगेत तुम्ही वाहत जाऊ नका, आपल्या आजूबाजूचं काही वाहून गेलेय ते तुम्हाला कळणार देखील नाही.”
राज्याच्या अर्थस्थितीवर टीका
महाराष्ट्राच्या कर्जाबाबत बोलताना ते म्हणाले, “११ लाख कोटींचं कर्ज आहे महाराष्ट्रावर… २०१४ ते २०२६ पर्यंत हे कर्ज ११ लाख कोटींवर गेलं आहे.” शहरांतील वाहतूक कोंडी, नियोजनाचा अभाव आणि वाढती गर्दी यावरही त्यांनी टीका केली.
“शहरं कोलमडून पडलीत”
शहरी व्यवस्थेवर प्रहार करत ते म्हणाले, “शहरं कोलमडून पडलेली आहेत… कोणीही येतंय कुठेही इमारती बांधतेय… तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवर व्यक्त करताय हे त्यांना हवंय.”
शेती आणि शेतकरी प्रश्न
राज ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी प्रश्न गंभीर असल्याचे सांगत म्हटले, “राज्यात तीन वेळा शेतकरी कर्जमाफी झाली… दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, कोणाला काही पडललेलं नाही.”
महाराष्ट्राच्या ओळखीचा प्रश्न
भाषा आणि संस्कृतीवर भर देताना ते म्हणाले, “आपण महाराष्ट्र म्हणून आपलं अस्तित्व गमावून बसतोय, आपली भाषा गमावून बसतोय… भाषा संपली म्हणून अनेक देश संपले आहेत.”
गुन्हेगारी आणि सामाजिक प्रश्न
राज्यातील ड्रग्ज समस्या आणि बेपत्ता मुलांच्या आकडेवारीवरही त्यांनी भाष्य केले. “नोव्हेंबर डिसेंबरमधील ३६ दिवसात मुंबईत ८२ मुलं बेपत्ता झाली… महाराष्ट्रात दरवर्षी साडे चार हजार ते साडे पाच हजार मुलं बेपत्ता होतात,” असे सांगत त्यांनी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली.
