मतदान केल्यानंतर बोटावरची पुसली जात असल्यामुळे राज ठाकरे संतापले
मुंबई, दि. १५: “सध्या संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागली आहे. हे काही चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. अशा प्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत,” अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि निवडणूक व्यवस्थेवर गंभीर आरोप केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, गुरुवारी राज ठाकरे यांनी दादर येथील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
राज ठाकरे म्हणाले की, “सध्या निवडणूक प्रक्रियेत नेमकी कशा प्रकारची यंत्रणा सुरू आहे, हे आपण सगळे बघत आहोत. येन केन प्रकारे निवडणुका जिंकायच्या, हे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. सरकारने ठरवलेच आहे की विरोधी पक्ष नावाची गोष्टच शिल्लक ठेवायची नाही.”
दुबार मतदार, VVPAT आणि PADU यंत्रावर सवाल
राज ठाकरे यांनी सांगितले की, “आम्ही सर्वप्रथम दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणला. तेव्हा निवडणूक आयोगाने आमचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं सांगितलं. त्यानंतर आम्ही VVPAT चा मुद्दा उपस्थित केला. VVPAT मशीन नसल्यामुळे आपण दिलेलं मत आपल्या उमेदवारालाच गेलं आहे की नाही, हे मतदाराला कळत नाही.”
ते पुढे म्हणाले की, “या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाने PADU यंत्र आणलं. हे PADU यंत्र मतमोजणीवेळी वापरलं जाणार आहे. मात्र, हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्यात आलेलं नाही. याबाबत निवडणूक आयोग कोणतीही स्पष्ट माहिती देत नाही.”
शाईऐवजी मार्कर, प्रचार मुदतीनंतरही भेटी – लोकशाहीवर प्रश्न
राज ठाकरे यांनी मतदान प्रक्रियेतील इतर बदलांवरही आक्षेप घेतला. “पूर्वी मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावली जायची. आता मार्करने खूण केली जाते. ही मार्करची शाई सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर पुसली जात आहे. मग शाई पुसून पुन्हा मतदानाला जायचं, यालाच विकास म्हणायचं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना शेवटच्या दिवशी घराघरांत जाऊन मतदारांना भेटण्याची मुभा देण्यात आल्यावरही त्यांनी टीका केली. “ही मुभा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पैसे वाटण्यासाठीच देण्यात आली आहे. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी अशा प्रकारे काम करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन
दरम्यान, दादरच्या छबिलदास येथील मतदान केंद्रावर सकाळी दुबार मतदार आढळून आल्याची माहिती देत राज ठाकरे यांनी शिवसैनिक आणि मनसैनिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
“आज दिवसभर दुबार मतदारांवर लक्ष ठेवा. सत्तेच्या गैरवापरालाही मर्यादा असायला हव्यात. आम्ही हे सगळे रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण या सगळ्या गोष्टी चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाहीत,” असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
