“धर्म तुमच्या घरात आचरणात आणा, मशिदीवरचे धोंगे हवेत कशाला?” : राज ठाकरे यांचा सवाल
आज सायंकाळी मनसेच्या राज्यव्यापी महाधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विषयात हात घालत साऱ्यांनाच चकित करून टाकले. यावेळी ते म्हणाले की, “मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे… मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन.”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
१. जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही.
२. पण सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते.
३. हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे.
४. धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही. आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हाकलून द्या हे सांगणारा पण मीच होतो.
५. माझं केंद्र सरकारला सांगणं आहे की समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल.
६. नरेंद्र मोदी जेंव्हा चुकले तेंव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेंव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम ३७० असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो.
७. सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे.
८. आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. आणि ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा.
९. आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे.
१०. बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं ह्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्च्याने देणार आहे.
