रायगडमधील पोशीर प्रकल्पास ६ हजार ३९४ कोटी
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील पोशीर व सिल्लार नदीवर धारण उभारण्याच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. अनुक्रमे ६ हजार ३९४ कोटी व ४ हजार ८६९ कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च असलेल्या या प्रकल्पामुळे लगतच्या मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांचा भविष्यातील पाणीपुरवठ्याचा मार्गी लागेल. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
पोशीर प्रकल्पासंबंधी थोडक्यात माहिती
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर १२.३४४ टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९.७२१ टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी ७.९३३ टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी १.८५९ टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (३३.९६ टक्के, २१७१.४५ कोटी रूपये), नवी मुंबई महानगरपालिका (४५.५३ टक्के, २७८३.३७ कोटी रूपये), उल्हासनगर महानगरपालिका (९.५६ टक्के, ६११.२८ कोटी रूपये), अंबरनाथ नगर परिषद (७.०७ टक्के, ४५२.०६ कोटी रूपये), बदलापूर नगर परिषद (५.८८ टक्के, ३७५.९७ कोटी रूपये) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविण्याकरिता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत लाभदायक स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.
शिलार प्रकल्पासंबंधी थोडक्यात माहिती
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर ६.६१ टी.एम.सी. क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. या योजनेस ४८६९.७२ कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी १५.०८, रक्कम ७३४.३५ रूपये कोटीत), पनवेल महानगरपालिका (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी ७५.४२, रक्कम ३६७२.७५ रूपये कोटीत), नवी मुंबई महानगरपालिका (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी ९.५, रक्कम ४६२.६२ रूपये कोटीत) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्प राबविण्याकरिता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत लाभदायक स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.
