राज्यात जिथे मोदी, तेथेच राहुल यांचा प्रचार
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यात धुळे, वर्ध्यानंतर आता मराठवाडय़ात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका पाठोपाठ एक सभा होणार आहेत.
महाराष्ट्रात जिथे मोदींची सभा होईल, तिथेच राहुल गांधी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करीत आहेत. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांत मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी भाजप-शिवसेना युतीच्या वर्धा, नागपूर व गोंदियामध्ये सभा घेतल्या. वर्धा येथे १ एप्रिलला पंतप्रधानांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याच ठिकाणी ६ एप्रिलला राहुल गांधी यांची सभा झाली.
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी यांचा धुळे येथे दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर १ मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा धुळे व मुंबई असा दौरा आयोजित करण्यात आला. त्या वेळी धुळे येथे ज्या ठिकाणी मोदी यांची सभा झाली, त्याच ठिकाणी राहुल यांची सभा घेऊन काँग्रेसनेही शक्तिप्रदर्शन केले. त्याच दिवशी मुंबईतही त्यांची सभा झाली.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भातील अकोला, अमरावती व बुलढाणा आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली अशा एकूण दहा मतदारसंघांत १८ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी विरुद्ध गांधी अशी लढत चांगलीच गाजणार आहे.