“भारताची राज्यघटना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक आहे” – राहुल गांधी
कोल्हापूर, दि. ५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक म्हणजे भारताची राज्यघटना आहे. ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं, जनतेनं घडवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारातून राज्यघटना साकारली असल्याचं प्रतिपादन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. शिवरायांनी ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढा दिला, त्यासाठी आज आपण उभे राहिलो नाही, तर पुतळा उभारणं निरर्थक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. शिवरायांच्या विचारधारेचं, राज्यघटनेचं रक्षण करण्याचं आवाहन त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं. त्यानंतर कोल्हापूरात झालेल्या संविधान संमेलनात राहुल गांधी यांनी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचं आश्वासन दिलं. तसंच जातनिहाय जनगणना, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करणार असल्याचंही ते म्हणाले.
