२०१५ मध्ये पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते – प्रियांका गांधी
उत्तर प्रदेश: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. अयोध्या दौऱ्यावर असताना प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानचा दौरा करत तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. या भेटीचा संदर्भ देत प्रियांका गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते’ असं यावेळी म्हटलं आहे.
अयोध्येत प्रसारमाध्यमांशी बोलताना राम मंदिराचं प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने आपण तिथे जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगभर फिरत असतात. अनेकांच्या गळाभेटी घेतात. पण आपल्याच लोकांना भेटणे ते नेहमी टाळतात’ असा टोला प्रियंका गांधी यांनी मोदींना लगावला आहे. देशात अनेक तरुण बेरोजगार फिरत आहेत. त्या तरुणांची कसलीही चिंता नाही. पंतप्रधानांकडे आपल्या देशातील गरिबांसाठी अजिबात वेळ नाही, असे देखील त्या म्हणाल्या.
