पनवेल मनपा हद्दीत प्लास्टिक चा मुक्त वापर; कारवाई कधी?
पनवेल, दि.२०: साधारण दोन वर्षांपूर्वी राज्यभरात प्लास्टिक बंदी ची मोहीम मोठ्या थाटामाटात आणि तितक्याच गंभीरपणे राबविण्यात आली होती. मधल्या काळात सत्तांतर झालं आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खात्याचा कारभार आला व त्यांनी या मोहिमेत एक वेळ अशी आणली की सगळ्यांना कापडी पिशव्यांची सवय लागली.
परंतू गेल्यावर्षी कोविड च संकट आलं आणि प्लस्टिक बंदी च्या मोहिमेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं. बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक बंदी ची मोहीम पुन्हा सुरू केली असून जागोजागी प्लास्टिक चा वापर व व्यापार करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केट परिसरात, कोपरे खैरणे आदी भागात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घाऊक विक्रेते व फेरीवाल्यांवर मोठी कारवाई केली. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या मोहिमेकडे विशेष लक्ष दिले असल्याचे कळते.

एका बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टीक बंदी च्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली असताना बाजूच्या पनवेल महानगरपालिकेत मात्र चित्र निराळं आहे. या ठिकाणी ५० मायक्रोन पेक्षा कमीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री होत आहे. प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.
पनवेल महानगरपालिकेचा आवाका पाहिला तर येथे किरकोळ व्यापारी सर्रासपणे प्लास्टिक चा वापर करताना दिसत आहेत. शिवाय येथील नागरिकांनी काही काळापूर्वी लावलेली कापडी पिशव्या सोबत ठेवण्याची सवय मोडलेली दिसते. काही जबाबदार पनवेलकर सोडले तर इतर मंडळी बाजारात खरेदीला निघताना घरून कापडी पिशवी सोबत नेण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत.
भारतासारख्या देशात प्लास्टक बंदी सारखी मोहीम यशस्वी करण्यासाठी कायद्याची काठोर अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या संदर्भात पालिका अधिकारी विशेषतः पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याकामी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा
