“उद्याही पाऊस पडला तर आपलं काय होणार?” उमेदवार पडले चिंतेत
महाराष्ट्र: गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे भलेही सामान्य माणसं वैतागली असली तरी या पावसाची सर्वात जास्त चिंता उद्याच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना लागून राहिली आहे. आधीच आपल्या देशात मतदार मतदानासाठी जीवावर येऊन बाहेर पडतात. ग्रामीण भागात चित्र थोडं आशादायी राहिलंय पण शहरी भागात मतदानाची टक्केवारी ही ५० टक्क्यांच्या आसपासच असते.
पण यावेळची परिस्थिती जरा वेगळी आहे. ऑक्टोबरचा पंधरवडा उलटला तरी काहि केल्या पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवाय या वेळच्या पावसाने सर्व प्रमुख नेत्यांना पावसात भाषण करण्याचा जरा फिल्मी अनुभव दिला. असो पण उद्याच्या दिवसात जर असंच पावसाळी वातावरण राहिलं तर मतदान केंद्रांबाहेर लोकं छत्री घेऊन रांगा लावतील का याची शाश्वती कोणताच नेता अथवा उमेदवार देऊ शकत नाही. शिवाय हवामान खात्याने कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे भागात पुढच्या ४८ तासांत परतीचा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. आजही साताऱ्यासह कोल्हापूर आणि पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवार हवालदिल झाले आहेत. आता पासूनच मतदारांना मतदार केंद्रांपर्यंत कसे आणता येईल याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. पाहूया हा उद्याचा पाऊस धुंवाधार बरसतो की उमेदवारांसाठी आकाश मोकळं मोकळं करून देतो !
(फोटो सौजन्य – निवडणूक आयोग)
