प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे दिले निर्देश
परभणी, दि. २८ : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचवून नागरिकांचे जीवन सुकर करावे. तसेच प्रत्येक विभागाकडे असलेल्या प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करावा, अशा सूचना राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी संजय चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परषिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीषा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पीक व इतर नुकसानीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडताना नदीकाठच्या गावांना वेळोवेळी सूचना देण्यात याव्यात. जेणेकरुन दुर्दैवी घटना टळतील. प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना खबरदारीचे उपाय सांगावेत, अशी सूचना पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेला केली.
याशिवाय नैसर्गिक समतोल राखण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. शाळांना संरक्षित भिंती बांधून त्याभोवती काटेरी करवंदाची रोपे लावण्याच्या सूचनाही दिल्या. प्रत्येक शहर व गावात स्वच्छता मोहिम हाती घ्यावी. कृषी विभागाने फळबाग लागवड क्षेत्र वाढवावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यात रस्त्यांची कामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागाने सहभागी होवून आपले कार्यालय स्वच्छ ठेवून जनतेचे कामे अधिक गतिमानतेने पूर्ण करावीत, आदी सूचना पालकमंत्री यांनी केल्या.
बैठकीत औद्योगिक ग्राहकांच्या वीज समस्या, जलजीवन मिशन, जनता दरबारातील प्रलंबित अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महानगर पालिका प्रशासन अंतर्गत कामांचा आढावा, नगरपालिका प्रशासन अंतर्गत कामांचा आढावा, वृक्ष लागवड आढावा, जिल्ह्यातील लघुसिंचन जलसंधारण विषयक कामे, पाझर तलावांच्या सुधारणा व दुरुस्ती करणे या विभागाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. यावेळी संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
