पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच! शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुन्हा पाठवले ड्रोन
नवी दिल्ली/जम्मू, दि. १०: भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय आज सायंकाळी घेतला खरा पण काही तासातच पाकिस्तानने भारताच्या हवाई क्षेत्रात ड्रोन पाठवत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
आज दुपारी पाकिस्तानच्या सैनिकी कारवाई महासंचालकांनी भारताच्या सैनिकी कारवाई महासंचालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्री मार्गांनी सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी करवाया थांबवण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी सायंकाळी निवेदनात दिली. पण काही तासातच पाकिस्तानने आपला शब्द फिरवत आपलं शेपूट हे वाकडंच असल्याचं सिद्ध केलं. पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टर मध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर राजस्थान येथील बारमेर व गुजरात मधील कच्छ आदि ठिकाणीही पाकिस्तानने हल्ला केल्याचे कळते. या ठिकाणी सध्या संपूर्ण ब्लॅक आउट करण्यात आला आहे.
दरम्यान, भारतानं सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध नेहमीच कणखर भूमिका घेतली असून यापुढेही ती तशीच राहील, अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काहीच वेळापूर्वी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली. या शस्त्र संधीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला होता.
