Saamana Logo
पाकिस्तान, काश्मीर प्रश्नांवर कायमचा तोडगा काढा- शिवसेना
आपण सर्वांनी एकत्र येऊन पाकव्याप्त काश्मीमध्ये तिरंगा फडकवू, तसेच भारताने पाकिस्तान आणि काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडवावा; राम मंदिराप्रमाणे हे प्रश्न आता पुढच्या निवडणुकांपर्यंत राखून ठेवू नका असे आवाहन शिवसेनेने मोदींना केले आहे. पाकविरुद्ध युद्धाची रणनीती आखल्याशिवाय पंतप्रधान मोदी आता थांबणार नाहीत याबाबत सर्व जनतेच्या मनात विश्वास आहे, आता त्यांनी थांबू नये सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने ही मागणी केली आहे.
फक्त ‘हुल झपाटा’ देऊन पंतप्रधान मोदी पाकिस्तानला सोडणार नाहीत ही जनभावना प्रबळ आहे. निदान पाकव्याप्त कश्मीरवर तरी नक्कीच तिरंगा फडकेल अशी रणनीती, युद्धनीती आखल्याशिवाय पंतप्रधान मोदी मागे हटणार नाहीत याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे. मोदी यांच्या आत्मविश्वासावर देशाचा विश्वास आहे. आता त्यांनी मागे हटू नये. पाकिस्तानचा साफ कचरा करा व कश्मीर प्रश्नाचा निचरा करा! देशाचे हे एवढेच मागणे आहे. राममंदिराप्रमाणे पुढच्या निवडणुकीपर्यंत हे प्रश्न शिल्लक ठेवू नका!
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात सध्या जी झटापट सुरू आहे त्यास युद्ध म्हणावे की आणखी काही म्हणावे? दोन देशांत युद्धासारखी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली आहे. आमच्या हवाई दलाने थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. त्यानंतर पाकची विमाने आमच्या हद्दीत घुसली. त्यातले एक ‘एफ-16’ विमान आमच्या जवानांनी टिपले व पाडले. याचा आनंद आहेच, पण त्याच वेळी आमचे एक ‘मिग’ विमान पाकिस्तानने पाडले व पायलट विंग कमांडर अभिनंदन पाक लष्कराच्या तावडीत सापडले. युद्धात हे घडणारच. सैनिकाचे आयुष्य हे असेच असते. म्हणूनच सारा देश जवानांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमीच उभा राहतो. पाकिस्तानला हादरा देणारी जोरदार कारवाई हिंदुस्थानी सैन्याने केली व त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल. पुलवामा हल्ल्यात 40 जवानांचे बळी घेतल्यावर ही कारवाई झाली. मात्र पाकिस्तानला आता शांतता हवी आहे व इम्रान खान यांनी तसे बोलून दाखवले आहे. त्यांना खरेच शांतता हवी आहे की पुढील चढाईच्या तयारीसाठी ते ‘वेळ’ काढत आहेत? शांतता हवी असेल तर कोणत्या अटी-शर्तींवर ते आताच ठरवा. मसूद अजहर, हाफिज सईद या सैतानांना ताब्यात द्या किंवा त्यांची मुंडकी तुम्हीच उडवून हिंदुस्थानला भेटीदाखल पाठवा. पाकच्या ताब्यात आमचा विंग कमांडर अभिनंदन आहे. त्यालाही लगेच परत पाठवा. (त्याला आता परत पाठवण्याची घोषणा पाकच्या पंतप्रधानांनी केली आहे) पण पाक तुरुंगात खितपत असलेल्या कुलभूषण जाधव यांना सोडवण्याचीदेखील हीच वेळ आहे. शांततेची हीच किंमत आहे. इम्रान खान यांना शांतता हवी, पण त्यांच्या लष्कराला आणि आयएसआयला ती हवी आहे काय? इम्रान खान यांनी शांततेची बांग द्यायची व त्याच वेळी पाकच्या लष्कराने पाठीत सुरे खुपसायचे ही त्यांची नेहमीची नीती असते. मुळात पाकिस्तानचे अर्थकारण पुरते कोसळले आहे व सैन्याचे मनोधैर्य खचले आहे. जगात त्यांच्या बाजूने जो उभा राहील तो विश्वशांतीचा दुश्मन ठरेल. म्हणून चीनसारखे राष्ट्रही या वेळी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा द्यायला तयार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थानी सैन्य आता लढायच्या मूडमध्ये आहे व रोज रोज आपल्याच भूमीवर रक्त सांडण्यापेक्षा शत्रूला मारूनच पुढे जावे ही भावना ज्वलंत आहे. कश्मीरसह सर्व प्रश्नांचा निचरा आताच करा व कच खाऊ नका. पंडित नेहरूंमुळे कश्मीर प्रश्न चिघळला. पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीरात सैन्य घुसणारच होते, पण पंडित नेहरूंनी सैन्याचे पाय खेचून चूक केली, असे श्री. मोदी व श्री. अमित शहा जाहीर सभांतून वारंवार सांगत आहेत. पंडित नेहरूंनी जी काही ऐतिहासिक चूक केली असे म्हणतात ती सुधारण्याची ही नामी संधी आता मोदी सरकारला मिळाली आहे. पुनः पुन्हा पाकिस्तान फाळणीचे खापर महात्मा गांधींवर नको व कश्मीरचे खापर पंडित नेहरूंवर नको. आता श्री. मोदी हेच महात्मा गांधी व अमित शहा हेच सरदार पटेल आहेत. त्यामुळे यानिमित्ताने पाकिस्तानचा पूर्ण खात्मा होईल, फक्त ‘हुल झपाटा’ देऊन त्यांना सोडणार नाही ही भावना प्रबळ आहे. निदान पाकव्याप्त कश्मीरवर तरी नक्कीच तिरंगा फडकेल अशी रणनीती, युद्धनीती आखल्याशिवाय पंतप्रधान मोदी मागे हटणार नाहीत याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे. देशातील विरोधी पक्षाने दिल्लीत घाईघाईने बैठक बोलावून काही मुद्दे उपस्थित केले. सैनिकी कारवाईचे राजकारण करू नका, हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे. विरोधकांचे मनोरथ ढासळल्याचे हे लक्षण आहे आणि त्यातून होणारी ही चिडचिड आहे. युद्धज्वरामुळे भाजपास फायदा होईल ही त्यांची भीती आहे. कदाचित मोदी निवडणुकाही पुढे ढकलतील असे त्यांना वाटत असावे. मात्र आम्ही त्यांना एक गोष्ट सांगतो. विरोधकांनी देशभक्तीच्या नव्या माहोलात विरघळून जावे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे की, पाकवरील कारवाईने आत्मविश्वास वाढला व दुश्मनांसमोर आम्ही भिंतीसारखे उभे आहोत. आता अशक्य ते शक्य आहे व सगळे चांगलेच होईल. मोदी यांच्या आत्मविश्वासावर देशाचा विश्वास आहे. आता त्यांनी मागे हटू नये. पाकिस्तानचा साफ कचरा करा व कश्मीर प्रश्नाचा निचरा करा! देशाचे हे एवढेच मागणे आहे. राममंदिराप्रमाणे पुढच्या निवडणुकीपर्यंत हे प्रश्न शिल्लक ठेवू नका!
