मुंबईत मर्यादित स्वरूपात अंमलबजावणी केली जाणार असल्याची बीएमसी आयुक्त गगराणी यांची माहिती
मुंबई, दि. १४: मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ‘पाडू’ ‘PADU’ (Printing Auxiliary Display Unit) या नव्या यंत्राचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएम प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून या यंत्राचा उपयोग केला जाणार आहे.
PADU यंत्राबाबत आधी अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती, याकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले होते. ईव्हीएम प्रणालीला नवीन यंत्र जोडण्याबाबत निवडणूक आयोगाने आधीच माहिती देणे अपेक्षित होते, असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार, PADU मशीनचा वापर मुंबईत सरसकट केला जाणार नाही. केवळ आपत्कालीन आणि अपवादात्मक परिस्थितीतच हे यंत्र वापरात आणले जाईल.
PADU मशीनचा उपयोग कशासाठी?
मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीकडील M3A प्रकारची ईव्हीएम यंत्रणा वापरण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडणे आवश्यक असते. या प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यास, PADU (Printing Auxiliary Display Unit) युनिटच्या मदतीने मतमोजणी पूर्ण केली जाते.
हे यंत्र स्वतंत्र मतदानासाठी वापरले जात नाही. आधी नोंदवलेल्या मतांची माहिती सुरक्षितरीत्या प्रदर्शित व छापण्यासाठीच त्याचा वापर केला जातो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका यांना एकूण १४० PADU युनिट्स प्राप्त झाल्या असून, त्या केवळ ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यासच वापरण्यात येणार आहेत.
