‘ऑपरेशन सिंदूर’ला जगाचा पाठिंबा तर पाकिस्तान म्हणतोय, ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन
मुंबई, दि. ०७: भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल साऱ्या जगानं भारताला पाठिंबा दिला आहे. भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्राएलने म्हटलं आहे. भारतातले इस्राएलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलं आहे की निरपराधांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना तोंड लपवायला जागा नाही हे समजलं पाहिजे. रशियाच्या परदेश मंत्रालय प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी कोणत्याही प्रकरच्या दहशतवादी कृत्याचा रशिया निषेध करत असल्याचं सांगून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचं आवाहन केलं आहे.
जपानचे परराष्ट्र मंत्री इवाया ताकेशी यांनी दहशतवादाविरोधातल्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार करत, दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असं आवाहन केलं आहे. जर्मनी दोन्ही देशांच्या संपर्कात असून त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंही शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीचे उपप्रधानमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी भारत आणि पाकिस्तानशी संपर्क साधून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान बिन जासिम अल थानी यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी संवाद साधून शांतता आणि संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी मदत देऊ केली आहे.
पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे.
एका बाजूला जगभरातील देशांकडून भारताला पाठींबा दिला जात असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने वेगळाच सूर आळवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे, असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी म्हटलं असून या हल्ल्याला उत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानला असल्याचं ते म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव लवकरच संपेल, अशी आशा व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्थितीवर आपण बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं आहे. शांततापूर्ण तोडगा निघावा यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू ठेवतील असंही त्यांनी पुढे सांगितलं. संयुक्त अरब अमिरातींचे उपप्रधानमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी भारत आणि पाकिस्तानशी संपर्क साधून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
Source – AIR
