संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित
नवी दिल्ली, दि. २०: संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला. त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना नियमांचं पालन करण्याचं आणि संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याचं आवाहन केलं. या निर्देशांचं पालन झालं नाही तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. संसदचं पावित्र्य कायम राखणं ही सर्व सदस्यांची संयुक्त जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी सर्व सदस्यांना करुन दिली. त्यानंतर गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली २ विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. या समितीमध्ये लोकसभेचे २७ आणि राज्यसभेचे १२ सदस्य आहेत.
भाजपाचे अनुराग ठाकूर, परषोत्तम रुपाला, काँग्रेसचे प्रियंका गांधी, मनीष तिवारी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्यासह सुप्रिया सुळे देखील या समितीच्या सदस्य आहेत. यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा ओम बिर्ला यांनी केली. राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आणि जनतेच्या विश्वासाचा सन्मान करण्याचं आवाहन केलं. पण गोंधळ सुरू राहिल्याने त्यांनी सुरुवातीला कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गोंधळ सुरूच राहिल्याने त्या गोंधळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली २ विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष धनखड यांनी केली.
