`नो मोअर पाकिस्तान’ या मोहिमेला बळकटी द्या : इंद्रेशकुमार
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर सुरु
दादर : पाकिस्तान हा सर्वच पातळ्यांवर कुचकामी ठरत असून येणा-या काळात नो मोअर पाकिस्तान (No More Pakistan) या भावनेतून प्रत्येक भारतीयाने मग त्यात प्रसारमाध्यमं, विचारवंत, राजकीय अथवा अन्य कुणीही असो, हीच भूमिका ठेवली पाहिजेत. कूटनीती ही बोलून दाखवली जात नाही आणि आपले बुद्धीजीवी इथेच चुकतात, तशी चूक न करता कार्य केले पाहिजे, असे विचार राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅट्रेजिक सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काश्मिर – पुढे काय या चर्चेत ते बोलत होते. यावेळी माजी पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षीत, माजी व्हाईस अॅडमिरल अभय कर्वे, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे राष्ट्रीय सचिव विनायक काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाकिस्तानला अनेकदा समजावले पण तो यापुढे समजेल की नाही, हीच शंका आहे. जन्म अखंड किंवा खंडित हिंदुस्थानात झाला तरी मृत्यू अखंड भारतातच होईल, या इर्षेने प्रत्येकाने राहिले पाहिजे. सध्या तरी राजकीय इच्छाशक्ती अनुकूल असल्यामुळे हे शक्य होईल, अशा परिस्थितीत आपण य़शस्वी झालो तर मानसरोवरला जाण्यासाठी चीनची परवानगी लागणार नाही, काश्मिरला जाण्यासाठी इतर भारतीयांना परवानगी लागणार नाही. लाहोरमध्येही भारतीय उद्योगव्यवसाय करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
केवळ शेख अब्दुल्लाच्या पंतप्रधानपदाच्या इच्छेपायी नेहरूंनी काश्मिर प्रश्न चिघळत ठेवला आणि स्वतंत्र भारतात देखील दोन वर्षे दोन पंतप्रधान झाले, पाकिस्तानची सीमा 1971 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारी 2019 मध्ये भारताने ओलांडली आणि फार मोठा संकेत संपूर्ण जगाला दिला आहे. त्या प्रतिकात्मक स्वरुपाचे अनेक अर्थ दडले आहे, म्हणूनच आता सर्व पातळ्यांवर आपण एकत्रितपणे कार्य केले पाहिजे, असे विचार व्हॉईस अॅडमिरल अभय कर्वे यांनी व्यक्त केले.

कलम 370 आणि 35 (ए) तयार करतानाच ते तात्पुरते असल्यामुळे ते कधीही रद्द करता येऊ शकते, या मुद्यांबाबत अॅड. एस. के. हलवासिया यांनी भाष्य केले तर तर कॅ. डी. के. सिंग यांनी ही दोन्ही कलमं असंवैधानिक असल्यामुळे त्वरित रद्द करावीत, अशी मागणी केली. विनायक काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी उपस्थितांना सन्मानित केले तर आभार कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी मानले.
