नवी मुंबई क्षेत्रात रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पालीकाच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई
नवी मुंबई, दि. १४: नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यावर/पदपथावर असलेले अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करुन त्याची विक्री करणारे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली व उप आयुक्त अतिक्रमण डॉ. कैलास गायकवाड यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आठही विभाग कार्यालयांतर्फे दि. १२ व १३ जून २०२५ अशा दोन्ही दिवशी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत आठही विभागांच्या क्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणा-या एकूण १९० विक्रेत्यांवर तसेच १५६ खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कार्यवाही करुन १५६ गॅस सिलेंडर, ६७ शेगड्या त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य, १९ हातगाड्या जप्त करण्यात आल्या व त्या डंपिंग यार्डला जमा करण्यात आल्या. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीमुळे होऊ शकणा-या अनेक आजारांना आळा घालण्याच्या दृष्टीने तथा अपघात टाळण्याच्या दृष्टीने सर्वच विभागांना दक्ष राहण्याचे निर्देश आयुक्त महोदयांनी दिलेले असून, त्यानुसार सर्व विभाग कार्यालये निरंतर कारवाया करण्यास तसेच जप्ती, गुन्हे दाखल करण्यास सज्ज आहेत.
