“खादी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी उच्च दर्जाची गुणवत्ता आणि संरचना आवश्यक” – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
महाराष्ट्रात ३४ खादी संस्था, ३८६९४ पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम युनिट्स आणि १३ स्फुर्ती क्लस्टरच्या माध्यमातून ३ लाख १९ हजार ०१४ लोकांना रोजगार – केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार
नागपूर, दि. ११: खादी आणि ग्रामोद्योग तसेच इतर लघुउद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असून या हातमाग, खादी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांची संरचना आणि उच्च दर्जाची ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूरच्या स्थानिक अमृत आंध्र भवन येथे खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ – केव्हिआयसीचे च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खादी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते .याप्रसंगी केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार ९ फेब्रुवारी पासून चालू झाले असून १६ फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. या प्रदर्शनात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील खादी संस्थांसह विविध राज्यांतून ६० स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

याप्रसंगी नितीन गडकरी यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे महत्त्व विषद करताना सांगितले की खादी उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘ वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.खादी हा भारताचा राष्ट्रीय वारसा असून त्याचा अवलंब करून आपण देशाची सेवा करू शकतो, असेही ते म्हणाले.

केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय – एमएसएमई मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘न्यू इंडियाज न्यू खादी’ या ‘खादी क्रांती’ने गेल्या १० वर्षांत खादी आणि ग्रामोद्योगांचा व्यवसाय १ लाख ५५ हजार कोटी रुपयांच्या पुढे नेला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षात १०.१७ लाख नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे.महाराष्ट्रात ३४ खादी संस्था, ३८६९४ पंतप्रधान रोजगार कार्यक्रम युनिट्स आणि १३ स्फुर्ती क्लस्टरच्या माध्यमातून ३ लाख १९ हजार ०१४ लोकांना रोजगार मिळत असल्याची माहिती मनोज कुमार यांनी दिली.विदर्भात १३ खादी संस्था कार्यरत आहेत ज्यातून ७३२ हून अधिक कारागीर लाभ घेत आहेत. ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ३२८० इलेक्ट्रिक व्हीलबॅरो आणि ६८०० मधमाश्यांच्या पेट्या आणि मध वसाहतींचे वाटप करण्यात आले आहे.

केव्हीआयसीने विदर्भात रोजगार निर्मितीसाठी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत.कुंभार सशक्तीकरण योजनेच्या माध्यमातून १ हजार ५८० कुंभारांना विद्युत चाक आणि ४ हजार ३०० मधमाशीपालकांना मधमाश्यांच्या पेट्या देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम-पीएमजीईपीच्या माध्यमातून २०२४-२५ या आर्थिक वर्षात विदर्भात ४०३ नवीन युनिट्सची स्थापना करण्यात आली आहे, ज्यासाठी केंद्र सरकारने १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्जिन मनी सबसिडी प्रदान केली आहे. या माध्यमातून एकट्या विदर्भात ३ हजार २२४ नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे.विदर्भात कार्यरत असलेल्या ४ स्फुर्ती क्लस्टरच्या माध्यमातून २ हजार ६६१ कारागिरांना रोजगार मिळत आहे.
S0HP.jpeg)
उद्घाटन कार्यक्रमात ‘खादी थीम’वर आधारित फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खादी संस्थांचे प्रतिनिधी, पीएमईजीपी युनिटचे लाभार्थी आणि केव्हीआयसीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
