भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मानवाधिकार विषयावरील दोन आठवड्यांच्या ऑनलाईन अल्पकालीन आंतरवासिता (Internship)कार्यक्रमाचा प्रारंभ
नवी दिल्ली, दि. १४: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC), दि. १३ मे २०२५ रोजी आपल्या २ आठवड्यांचा ऑनलाईन अल्पकालीन आंतरवासिता (Online Short Term Internship – OSTI) कार्यक्रमाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यापीठ स्तरावरील विविध शैक्षणिक शाखांमधून 1,795 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यामधून ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. देशातील मानवाधिकार विषयक प्रचार प्रसार आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासंबंधित सर्वंकष जाणिवजागृती करणे हा या दोन आठवड्यांच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महासचिव, भरत लाल यांनी संबोधित केले. दयाभाव, करुणा आणि न्याय ही भारताच्या ५,००० वर्षांपासूनच्या नागरी संस्कृतीची मूल्ये आहेत आणि युवा पिढी ही जुन्या मुल्यांची मशालवाहक आहे असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी न्याय, समता आणि सन्मानाचे दूत म्हणून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. भारताची घटनात्मक संरचना समजून घेण्यासाठी तसेच सर्वांच्या मानवाधिकार आणि सर्वांच्या सन्मानाचे पाठीराखे होण्यासाठी या संधीचा उपयोग करून घ्यावा असे प्रोत्साहन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. ज्यांना प्रवास करून दिल्लीपर्यंत येणे – इथे राहणे शक्य नाही अशा दूरवरच्या आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मानवाधिकारांच्या विविध पैलूंची माहिती मिळावी या उद्देशानेच हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.

भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे संयुक्त सचिव, समीर कुमार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आंतरवासिता कार्यक्रमाची आणि त्याकरता अत्यंत बारकाईने तयार केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती त्यांनी दिली.

विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना मानवाधिकाराशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करता यावे या अनुषंगाने या अल्पकालीन ऑनलाईन आंतरवासिता कार्यक्रमाची आखणी केली गेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी परस्पर संवादात्मक सत्रे आणि लक्षवेधी उपक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा, भारतातील विशिष्ट मानवाधिकार विषयक समस्या आणि वकिलीच्या प्रभावी धोरणांसंबंधीची सखोल माहिती आणि ज्ञान प्राप्त करू शकणार आहेत.


