सोशल मीडिया बंदीविरोधातील जनआक्रोशात आंदोलन चिघळले
काठमांडू, दि. ९: नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी देशभर सुरू असलेल्या तीव्र आणि हिंसक निदर्शनांनंतर राजीनामा दिला आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर घातलेल्या बंदीमुळे उभा राहिलेला जनआंदोलने आता व्यापक स्वरूप घेतले असून, निदर्शकांनी पंतप्रधानांचे खाजगी निवासस्थान पेटवून दिले. सरकारने फेसबुक, यूट्यूब, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इंस्टाग्राम यांसारख्या प्रमुख सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यावरून देशभरात असंतोष उसळला. विशेषतः तरुणाई, विशेषतः जेन-झी Gen Z, या निर्णयाला विरोध करत रस्त्यावर उतरली.
हिंसक आंदोलन, अनेक ठिकाणी हल्ले
काठमांडू खोऱ्यात आणि इतर जिल्ह्यांमध्ये तरुणांनी राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांवर हल्ले चढवले. ललितपूरमधील माहिती व तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरूंग यांच्या घराला आग लावण्यात आली, तर अर्थमंत्री बिष्णु पौडेल यांच्या भैसेपाटीतील निवासस्थानावर दगडफेक झाली. माजी गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घरावरही हल्ला झाला. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या बुढानीलकंठ येथील निवासस्थानाकडेही निदर्शकांनी वाटचाल केली, पण सुरक्षा दलांनी त्यांना थांबवले. माओवादी नेते पुष्पकमल दाहाल उर्फ प्रचंड यांच्या खुमलटारमधील घरावरही दगडफेक झाली. काठमांडू, ललितपूर आणि भक्तपूर जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. सभासदांची जमवाजमव, मोर्चे, सभा, बैठकांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही निदर्शकांनी न्यू बानेश्वर आणि कलंकी चौक यासारख्या ठिकाणी संचारबंदी झुगारून निदर्शने केली.
कलंकी चौकात टायर्स जाळले, रस्ते बंद
कलंकी चौकात तरुणांनी टायर जाळून निदर्शने केली आणि मुख्य रस्ता बंद केला. पोलीस दलाला जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे, परंतु वातावरण तणावपूर्णच आहे. सरकारने सोशल मीडिया बंदी मागे घेतली आहे, मात्र तो निर्णय उशिरा घेतल्याची जनतेची भावना आहे. गेल्या काही दिवसांत निदर्शनांत किमान १९ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. संचारबंदी दरम्यान अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल, आरोग्य कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, पर्यटकांची वाहतूक, मानवाधिकार संस्था आणि राजनैतिक सेवा यांना सूट देण्यात आली आहे. तसेच विमान प्रवाशांना तिकिटाच्या आधारे पोलीस मदत करत आहेत.
नेपाळमधील सद्यस्थिती हे केवळ सोशल मीडिया बंदीविरोधातील आंदोलन नसून, भ्रष्टाचार, बेकारी, आणि ‘नेपो किड्स’ विरुद्धचा प्रचंड असंतोष आहे. तरुण पिढी आता केवळ विरोध नाही तर परिवर्तन मागत आहे. ओली यांचा राजीनामा हा त्या दीर्घ संघर्षातील एक टप्पा मानला जात आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह हे या काळात एक उभरते राज्यकर्ते म्हणून चर्चेत आहेत. ते रॅपर, स्ट्रक्चरल इंजिनिअर, आणि युवा वर्गाचे आदर्श म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर आणि ‘Gen Z’ च्या माध्यमातून मिळालेल्या लोकप्रियतेमुळे, त्यांना पुढील पंतप्रधान म्हणून बऱ्याचजणांनी पुढे आणले आहे
