नेरूळच्या निरंत पाटील यांचा ‘नमुंमपा क्षेत्र श्री’वर कब्जा
नवी मुंबई, दि. २२: राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ तसेच ‘नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ या स्पर्धा विष्णुदास भावे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून विविध वजनी गटांत एकूण १२८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून कोल्हापूरच्या अजिंक्य रेडकर यांनी सरस कामगिरी करत दीड लाख रुपयांच्या पारितोषिकासह ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू २०२५–२६’ हा किताब आणि मानाचा चषक पटकावला. सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी ५० हजार रुपयांच्या बक्षिसासह राज्यस्तरीय उपविजेतेपद मिळवले.
‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री २०२५–२६’ या महानगरपालिका स्तरावरील स्पर्धेत ७१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामधून नेरूळच्या निरंत पाटील यांनी ७० हजार रुपयांच्या पारितोषिकासह ‘नमुंमपा क्षेत्र श्री’चा मानाचा किताब जिंकला. तर नेरूळच्या अक्षय पाटील यांनी ३८ हजार रुपयांच्या बक्षिसासह उपविजेतेपद संपादन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेत ठाण्याच्या मोहम्मद जमाल यांना ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ तर रायगडच्या स्वप्निल सकपाळ यांना ‘बेस्ट पोझर’ हा किताब बहाल करण्यात आला. दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकूण १९९ शरीरसौष्ठवपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. या स्पर्धेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते झाले. महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर सहा वर्षांनंतर या स्पर्धा पुन्हा ‘नवी मुंबई महापौर श्री’ या पूर्वीच्या नावाने आयोजित करण्यात आल्या.
यावेळी बोलताना महापौरांनी व्यायाम आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध अधोरेखित केला. युवकांनी व्यायामाकडे वळल्यास ते व्यसनांपासून दूर राहतील आणि शहर अधिक निरोगी बनेल, असे त्यांनी सांगितले. अशा स्पर्धांमुळे युवकांना प्रेरणा मिळून व्यायामाची आवड वाढते, असेही त्या म्हणाल्या. पुढील काळात अधिकाधिक स्पर्धकांचा सहभाग वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
समारोपप्रसंगी राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली. घणसोली येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन सुरू असून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी व माजी खासदार संजीव नाईक यांनी १९९६ पासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या स्पर्धेचे राज्यभरातील खेळाडूंमध्ये विशेष आकर्षण असल्याचे नमूद केले.
क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे यांनी स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना तंदुरुस्तीबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत सर्वांचे स्वागत केले. उद्घाटन समारंभास महापौर सुजाता सुरज पाटील, उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष गोपाळ गायकवाड, पदाधिकारी शरद मारणे व अजय गोळे, नवी मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष जी. एस. पाटील, सेक्रेटरी हेमंत खेबडे, विनय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘नवी मुंबई महापौर श्री’ राज्यस्तरीय स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ किलोपर्यंत आणि ८५ किलोवरील अशा ८ गटांत पार पडली. तर ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ स्पर्धा ५०, ५५, ६०, ६५, ७० किलोपर्यंत आणि ७० किलोवरील अशा ६ गटांत झाली. प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ६ आणि ५ विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देण्यात आली. सायंकाळी ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२.१५ वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाट्यगृह येथे स्पर्धक आणि क्रीडारसिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
