राज्यात येत्या ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान सभांचे आयोजन
मुंबई, दि. ०६: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रावादी(दोन्ही पक्ष), शिवसेना(दोन्ही गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी व तिसऱ्या आघाडीने प्रचाराला सुरुवात केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीहि सुरु झाल्या आहेत. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारानिमित्त राज्यात सभा घेणार का नाही याबाबत उलटसुलट तर्क लढवले जात होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश प्राप्त न झाल्यामुळे पंतप्रधान विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराला महाराष्ट्रात पाऊल ठेवणे मुश्कील असल्याचे राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चा होती.
परंतू, आता या साऱ्या चर्चांना आता विराम पडला असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात येत्या आठ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत. आठ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिक, नऊ तारखेला अकोला आणि नांदेड, १२ तारखेला चंद्रपूर, चिमूर, सोलापूर आणि पुणे आणि १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमुळे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर सारण्यास मदत होऊ शकते असे काही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
