गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना
मुंबई दि. २५ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष ‘नमो एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यामार्फत दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात येते. यात विशेषकरून दक्षिण मुंबईतील त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांचा भरणा असतो. कोकणात जाणाऱ्या २ हजार गणेशभक्तांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही विशेष गाडी सोडण्यात आली असून, थेट खेडला पहिला थांबा घेणार आहे. त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या शेवटच्या स्थानकावर थांबणार आहे. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी ‘नमो एक्सप्रेस’ आयोजित करून अतिशय चांगली सुविधा दिली असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले.
