“आशियातील पहिला चार स्तरीय वाहतूक असलेला एलआयसी ते ऑटोमॅटिव्ह चौक पर्यंतच्या डबल डेकर उड्डाणपूलामुळे कामठी आणि छिंदवाडा रोडवरील वाहतूक होणार सुरळीत आणि अपघात-मुक्त” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर, दि. ५: जे देशात नाही, आशियात नाही ते नागपूर मध्ये आहे असे सांगून अजनी चौक ते एअरपोर्ट हा डबल डेकर उड्डाणपूल, पूर्व नागपूरच्या पारडी मध्ये असणारा डबल-डेकर पूल आता नागपुरातील हा तिसरा एलआयसी ते ऑटोमॅटिव्ह चौक पर्यंत असलेला हा डबल डेकर पूल हा आशियातील चार स्तरीय वाहतूक असणारा पहिला डबल डेकर पूल ठरला असून या पुलामुळे कामठी आणि छिंदवाडा रोडवरील वाहतूक सुरळीत तसेच अपघात मुक्त होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले. स्थानिक एलआयसी चौकामध्ये आयोजित या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी गडकरी यांनी या उड्डाणपुलाच्या साठी भूसंपादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान लेखाशीर्षामध्ये निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच भूसंपादनाचे अवघड काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांचे देखील त्यांनी आभार मानले. केंद्रीय रस्ते निधीतून कामठी रोड हा सिमेंट काँक्रीटचा करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर शहर हे आपल्या नवनवीन उपक्रमासोबतच वाडी फ्लायओवर, रवी नगर येथील फ्लायओवर अशा नवीन पुला सोबत नागपूर हे फ्लायओवर चे शहर म्हणून देखील ओळखण्यात येत आहे असं गडकरी यांनी सांगितले.
महा मेट्रो आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आशियातील सर्वात लांब डबल डेकर मार्गांपैकी एक आहे. ८९७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलामध्ये केवळ डबल डेकर पुलाचा खर्च ५७३ कोटी रुपये आहे. ५.६ किमी लांबीच्या ४-लेन कामठी रोडवर असणा-या या डबल डेकर उड्डाणपुलाच्या संरचनेत रिब आणि स्पाइन या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे नैसर्गिक प्रकाश आणि हवा पुरेशा प्रमाणात उड्डाणपुलामध्ये येऊ शकते. ही रचना उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गाला जोडून चार-स्तरीय वाहतूक व्यवस्था तयार करते. पहिल्या स्तरावर राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या स्तरावर भारतीय रेल्वे ट्रॅक आणि तिस-या स्तरावर उड्डाणपूल तर चौथ्या स्तरावर रेल्वे मेट्रो मार्ग आहे. गड्डि गोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटीव्ह चौक अशी पाच मेट्रो स्थानके या उड्डाण पुलावर आहेत. विशेष म्हणजे गड्डी गोदामजवळ १६५० टन क्षमतेचा पोलादी पूल तयार करून बसवण्यात आला आहे. एवढ्या वजनाची क्षमता असलेला पूल शहरी भागात प्रथमच बांधण्यात आला आहे.
आशिया खंडात प्रथमच तयार करण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या या अप्रतिम कलाकृतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पामुळे नागपूर-जबलपूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय थेट त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचता येणार आहे. कामठीकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कामठी रोड हा दाट लोकवस्तीचा परिसर असून महामार्गाच्या खाली अवजड वाहतूक असते. या उड्डाणपुलामुळे ही गर्दी कमी होऊन वाहतूक सुरळीत व कार्यक्षम होईल.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे यांनी केलं. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते
