रसायनांनी भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे, मुंबई-पुणे मार्ग ठप्प, तरीही टोल वसुली सुरू
खोपोली, दि. ४ : जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली टोलनाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे गेल्या २४ तासांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या गंभीर परिस्थितीतही प्रवाशांकडून टोल वसुली सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काल मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ केमिकल वाहून नेणारा टँकर पलटी झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग पूर्णपणे जाम झाला.
धक्कादायक बाब म्हणजे अपघातस्थळी आरआरबीचे किंवा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आले. परिणामी मोठ्या संख्येने प्रवासी जुन्या महामार्गाकडे वळल्याने खोपोली परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवासी तब्बल २४ तासांहून अधिक काळ ट्रॅफिकमध्ये अडकून पडले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पूर्णपणे ठप्प असतानाही टोल वसुली सुरू ठेवण्यात आल्याने संताप अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी टोल वसुली थांबवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याची माहिती दिली.
