मुंबईत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १७.७३ टक्के मतदान
मुंबई, दि. १५: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज, १५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. राजधानी मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही मतदान केंद्रांवर किरकोळ तक्रारी नोंदवण्यात आल्या असल्या तरी एकूण मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मुंबईत मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. शहरात एकूण १०,२३१ मतदान केंद्रे असून, प्रत्येक केंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरळीत सुरू आहे.
उमेदवार आणि मतदारांची संख्या
या निवडणुकीत मुंबईत एकूण सुमारे १,७०० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४८ लाख २६ हजार ५०९ महिला मतदारांचा समावेश असून, १,०९९ मतदार ‘इतर’ प्रवर्गात नोंदणीकृत आहेत.
काही मतदान केंद्रांवर मतदार यादीतील नावांबाबत गोंधळ दिसून आला. नाव शोधण्यासाठी काही ठिकाणी मतदारांची धावपळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबईत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार रविंद्र वायकर, आमदार संजय उपाध्याय यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनीही मतदान केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
* फोटो संग्रहित आहे
