परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई, दि. ५ : राज्य परिवहन सेवेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवेत असताना मद्यपानाला आळा घालण्यासाठी सर्व चालक आणि वाहकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. आगारात ड्युटीवर हजर होणाऱ्या चालकांची दररोज अल्कोटेस्ट करून योग्य नोंद घेतल्यानंतरच त्यांना कर्तव्यावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
परळ बसस्थानक भेटीनंतर निर्णय
२५ जानेवारी २०२६ रोजी प्रताप सरनाईक यांनी परळ बसस्थानक येथे अचानक भेट दिली असता काही गंभीर बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. या घटनेची दखल घेत त्यांनी तातडीने चौकशी समिती नेमून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
चौकशी समितीचा अहवाल सादर
एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समितीने सुचवलेल्या उपाययोजना सर्व आगारांमध्ये तातडीने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चालक-वाहक तपासणीची नवी पद्धत
नव्या नियमांनुसार आगारात ड्युटीवर येणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांकडून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे अनिवार्य राहणार आहे.
या तपासणीवर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगार व्यवस्थापकांनीही या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मार्गावर असतानाही तपासणी
बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अल्कोटेस्ट करून योग्य नोंद घेतल्यानंतरच चालकाला पुढील मार्गावर पाठविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया नियमितपणे राबवली जाते की नाही याची खात्री स्थानक प्रमुखांनी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
आगार व विश्रांतीगृहांमध्येही तपासणी
बसस्थानक परिसर, आगार आणि चालक-वाहक विश्रांतीगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट तपासणी केली जाणार आहे. या तपासण्यांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक राहणार असून संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान त्याची पडताळणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गोपनीय तपासणी मोहीम
या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्गतपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातूनही तपासणी कार्यक्रम राबवला जाणार आहे.
जनजागृतीसाठी प्रशिक्षण
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन करण्यात येणार असून आगारांमध्ये ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित केला जाणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानके, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि आगार परिसरात विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिथ्यगृह परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच लाईट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानाविरोधात कठोर भूमिका घेतली असून या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
