‘हे’ केंद्रीय मंत्री प्रियंका गांधींना भर सभेत ‘पप्पी’ म्हणाले
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सध्या सर्वच पक्षात आरोप-प्रत्यारोपाचे जुने खेळ सुरु झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर काँग्रेसवर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार महेश शर्मा यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पप्पी म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सिकंदराबाद येथे आयोजित एका सभेत बोलताना महेश शर्मा यांनी राहुल गांधी यांचा ‘पप्पू’ तर प्रियंका गांधी यांचा ‘पप्पी’ म्हणून उल्लेख केला. सभेत उपस्थित एका व्यक्तीने महेश शर्मा बोलत असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओत महेश शर्मा असे बोलताना दिसत आहेत की ,‘संसदेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागच्या बाकावर बसलो होतो. राहुल गांधींनी डोळा मारलेलं पाहून मीदेखील घायाळ झालो होतो. आता पप्पू म्हणतोय की मला पंतप्रधान व्हायचं आहे. आणि आता तर पप्पूची पप्पीदेखील आली आहे. आता मायावती, अखिलेश यादव, पप्पू आणि पप्पूची पप्पीदेखील आली आहे.’ या विधानानंतर शर्मा यांच्यावर टीका होत आहे.