ह्या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणाऱ्या विरोधी पक्षाची : राज ठाकरे
मुंबई: “पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?” असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सांताक्रूझ येथील सभेत केला. कालची पुण्यातील प्रचाराची पाहिली सभा पावसामुळे रद्द झाल्यामुळे मनसैनिकांचा मूड थोडा खराब होता. पण आज मुंबईत झालेल्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारल्याचे पाहायला मिळाले.
पुढे आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, “मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय; ते मागणं म्हणजे, ह्या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणाऱ्या विरोधी पक्षाची. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो, मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय. आज गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल आणि म्हणून मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन आलोय.”
राज यांच्या आजच्या सभेतील भाषणावरून जाणवेल की ते सक्षम विरोधीपक्ष म्हणून स्वतःला आधी सिद्ध करू इच्छितात.
