मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने जाहीर केला ‘मराठीनामा’
मुंबई, दि. ४: राज्यात तब्बल १८ वर्षानंतर विलग झालेले ठाकरे बंधू एका विषयामुळे एकत्र आले. तो होता राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात आणलेला इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा विषय. पण, या हिंदी सक्तीला अगदी पहिल्या दिवसापासून विरोध करणाऱ्यांत तसेच मराठी भाषेसाठीच्या आंदोलनाची इतिश्री करणाऱ्यांत अग्रणी नाव होतं व आहे ते म्हणजे मराठी अभ्यास केंद्राचं. मराठी भाषेसाठी कडवट परंतु संविधानिक मार्गाने मागील अनेक वर्षांपासून आंदोलन हि संस्था आंदोलन करत आलेली आहे. येत्या मुंबई महानगरपलिका व इतर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याच मराठी अभ्यास केंद्राने आपला ‘मराठीनामा’ प्रसिध्द केला आहे. हा ‘मराठीनामा’ महानगरपालिकेच्या निवडणूकिसाठी मतदान करणाऱ्या मतदारांकरिता जसा आहे तसाच तो पालिका प्रशासनासाठीही आहे हे विशेष. जाणून घ्या नेमके कोणते मुद्दे या मराठीनाम्यात नमूद करण्यात आलेले आहेत.
महानगरपालिका निवडणूक मतदारांकरिता
◆ राजकीय पक्ष आणि धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्या.
◆ जिथे एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथे मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्त्व देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या.
◆ सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलू शकणाऱ्या उमेदवारालाच पसंती द्या.
◆ निवडणुकीचा प्रचार, प्रसार मराठीतून करणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य द्या.
◆ स्थलांतरितांसाठी महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक ओळख पुसून टाकणाऱ्या मराठी/अमराठी उमेदवाराला नाकारा.
महानगरपालिका प्रशासनाकरिता
◆ महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत.
◆ महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह पालिकेचे सर्व प्रकारचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार, खरेदी आदेश, पावत्या मराठी भाषेतच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
◆ महानगरपालिका हद्दीतील दुकानांच्या पाट्या मराठीत नसणाऱ्या दुकानदारांवर कठोर आणि तातडीने दंड वसूल करावा. अंमलबजावणीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
◆ मांसाहारावरून घरे नाकारणाऱ्या संस्थेच्या निवासी इमारती अनधिकृत ठरवून त्यांचे पाणी, वीज तात्काळ कापून टाकावे. तसेच, ओसी आणि अग्निरोध प्रतिबंधक प्रमाणपत्र रद्द करावे.
◆ महानगरपालिका हद्दीतील रस्ते, चौक, बागा, क्रीडांगणे, मैदाने यांना मराठी व्यक्ती, मराठी संस्कृती यांच्या प्रतीकांची नावे द्यावीत.
◆ महानगरपालिका हद्दीतील मराठी भाषेवरील अन्यायाची तक्रार नोंदविण्यासाठी प्रभागनिहाय ‘मराठी दक्षता केंद्र’ उपलब्ध करून द्यावी.
◆ विधीमंडळ राजभाषा समितीच्या धर्तीवर महानगर पालिकेचे कामकाज मराठीतून होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मनपा राजभाषा समिती स्थापन करावी.
◆ मुंबई शहराचे ‘मराठीपण’ सार्वजनिक ठिकाणी दृश्यमान होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. रस्ते, सार्वजनिक इमारती, वाहतूक व्यवस्था, उद्याने, नाटके व चित्रपटगृहे, सभागृहे इ. ठिकाणी मराठीचा वापर प्राधान्याने व ठळकपणे झाला पाहिजे.
◆ अमराठी लोकांना मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रभागनिहाय ऑफलाईन तसेच ऑनलाइन केंद्रे सुरू करणे.
