“ह्या बांधवांना पाणी, अन्न, शौचालये अशा सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा. हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे!” – उद्धव ठाकरे
मुंबई, दि. ३०: कालपासून मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. कालचा पहिलाच दिवस आंदोलकांना त्रासदायक ठरला. त्याला मुख्यत्वे कारण ठरले आसपासच्या खाऊ गल्ल्या बंद असणे व स्वच्छतागृहांची व्यवस्था नसणे. कालचा सबंध दिवस शेकडो आंदोलक अन्नपाण्यावाचून तिष्ठत राहिले. काल रात्री उशिरा शिवसेना ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पाणी व खाद्यपदार्थ वाटप केले. या आंदोलनाला ठाकरे-पवारांची फूस आहे असा आरोप कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता त्यामुळे शिवसेना उघडपणे आंदोलनात दिसत नव्हती. परंतु, आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली व त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणे करून दिले. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
थोड्याच वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेने समाज माध्यमांद्वारे अधिकृतरित्या पोस्ट केली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मुंबईत आलेल्या मराठी बांधवांसाठी पूर्ण मदत करावी असे आवाहन केले आहे. आपल्या संदेशात उद्धव ठाकरे म्हणाले आहेत कि, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे, ही संख्या हजारोंच्या घरात आहे. पाऊसपाण्यात-चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. अशा वेळी तमाम शिवसैनिकांना माझे आवाहन आहे की ह्या बांधवांना पाणी, अन्न, शौचालये अशा सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा. हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे! जय महाराष्ट्र!”
उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिवसैनिकांना रसद पुरविण्याचे आदेश देत एक प्रकारे थेट सहभाग नोंदवला आहे.
