धुंवाधार पावसात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण, काही मराठा आंदोलकांना नवी मुंबईत आंदोलन करण्याच्या दिल्या सूचना
मुंबई, दि. २९: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला सुरुवात करण्याआधी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संयम पाळण्याचं आवाहन केलं. आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड गर्दी झाली असून काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जाऊन तिथे आंदोलन सुरू करावं, अशा सूचना जरांगे यांनी केल्या आहेत. दरम्यान, मराठा आंदोलनामुळे आझाद मैदानाच्या दिशेने येणाऱ्या विविध मार्गांवर वाहतुक पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.
मराठा आंदोलनामुळे मुंबई महापालिका परिसरातील सर्व रस्ते, पूर्व द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पूर्व मुक्त मार्गांवर त्यांच्या गाड्या थांबवल्या होत्या. परंतु तिथून अनेकजण पायी आझाद मैदानात दाखल झाले. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरील रस्त्यावर ठिय्या दिला असल्यान इथली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे. सुमारे तीन हजार गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झाला आहे. पाच हजार लोकांनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार असं पोलिसांनी आंदोलकांना सांगितलं होते.
‘या’ आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या
१. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही
२. हैदराबाद गझेटियर लागू करा…१३ महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे
३. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या
४. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
